पुणे – ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात मंगळवारी गणरायाला निरोप देण्यात आला. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीचे अत्यंत साधेपणाने विसर्जन करण्यात आले आहे. यामुळे पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांचे आभार मानले.
कसलाही भपका नाही, मोठमोठ्या मूर्ती नाहीत, मिरवणूक नाही. सारे कसे साधेपणाने शिस्तीत आणि पर्यावरणाची काळजी घेऊनच. पुढच्या वर्षीही गणेशोत्सव प्रचंड उत्साहाने पण अशाच शिस्तीने, इकोफ्रेंडली पद्धतीने साजरा होऊ दे, असे ट्विट डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे.
आभार #ganeshvisarjan pic.twitter.com/1kDWgoSLJp
— CP Pune City (@CPPuneCity) September 1, 2020
दरम्यान, पुण्यातील मिरवणुका म्हणजे आसमंतात घुमणारा ढोल-ताशांचा गजर, सनई-चौघड्यांचे सूर आणि नगाराचा निनाद असे सुरेल समीकरण असते. हे मंत्रमुग्ध करणारे वादन अनुभवण्यासाठी देश-विदेशांतून गणेशभक्त आवर्जून येतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने आणि गणेश मूर्तीचे विसर्जन घरच्या घरीच करण्याचे आवाहन पुणेकरांना यापूर्वीच केले होते. या आवाहनाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.