पुणे विद्यापीठाच्या हालचाली : सव्वादोन लाखांवर असतील परीक्षार्थी
कार्यपुस्तिकेद्वारे दूर करणार संभ्रम
पुणे – सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या सूचनेनुसार परीक्षा विभागाने तयारी सुरू केली आहे.
विद्यापीठातर्फे लवकरच परीक्षांबाबतची कार्यपुस्तिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जाणार आहे, त्याबाबत स्पष्टता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने व राज्य शासनाने घेतलेल्या परस्पर भूमिकेमुळे राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, न्यायालयाने याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याने विद्यापीठांनी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागणार आहे. मात्र, विद्यापीठाकडून परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जाणार याबाबत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती सर्व घटकांना अवगत करून देणे आवश्यक आहे.
विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक या सर्वांना परीक्षा कशा व कोणत्या पद्धतीने घेतल्या जातील याविषयी स्पष्ट कल्पना विद्यापीठातर्फे दिली जाणार आहे, त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. या कार्यपुस्तिका प्रसिद्ध केले जाणार असल्याने विद्यार्थ्यांनासह शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना परीक्षेची सर्व बाबी समजणार आहे. त्यामुळे परीक्षेविषयी संभ्रम राहणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.