फिरोदिया प्रशालेच्या 1992 च्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
1 लाख 25 हजार गरजूंना मदत
नगर (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च मध्ये टाळेबंदी जाहीर झाल्याने बेरोजगाराचे संकट कोसळलल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. याकाळात मदतीचा हात म्हणून भाऊसाहेब फिरोदिया प्रशालेच्या 1992 च्या दहावीच्या वर्गातील मित्र मैत्रिणींनी आपली सामाजिक बांधिलकी ओळखून झेप फाउंडेशनच्या माध्यमातून 1 लाख 25 हजार गरजूंना अन्न धान्याचे वाटप केले.
झेप फाउंडेशन संस्थेचे रेश्मा सांबरे व प्रसाद झावरे आणि झावरे हॉस्पिटलचे संचालक डॉ सागर झावरे यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली. सुरुवातीला काही मित्र मैत्रिणींनी सुरू केलेल्या या उपक्रमाला अनेक दानशूर व्यक्तींनी हातभार लावला आणि पाहता पाहता एक मोठे सामाजिक कार्य उभे राहिले.
झेप फाउंडेशनने हाती घेतलेल्या या प्रकल्पात गेल्या चार महिन्यात तांदूळ, कणिक (आटा), गहू, डाळ, तेल, मसाला, भाजीपाला तसेच सुरक्षेसाठी मास्क इत्यादींचे वितरण समाजातील गरजू, उपेक्षित आणि पीडीत व्यक्तींना केले. स्थलांतरित कामगार, बेरोजगार, गरीब वसाहतीतील रहिवासी, तृतीयपंथी, अनाथ मुले, विधवा, आदिवासी तसेच वेश्यावस्तीतील मुले, मुली इत्यादी समाजातील उपेक्षित घटक या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत.
नगर शहरातील मुकुंद नगर, फकीर वाडा, इंदिरा नगर, बजाज नगर, दातरंगे मळा, माळी वाडा, नालेगाव, कायनेटिक चौक, शनी चौक तसेच नांदगाव, कर्जत, जामखेड रस्ता, वडगाव गुप्ता परिसरात वाटप करण्यात आले.