पहिल्या नियमित फेरीचे “कट ऑफ’ही पोर्टलवर दिसणार
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी रविवारी जाहीर करण्यात येणार आहे. यात कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळणार, हे विद्यार्थ्यांना समजणार आहे.
प्रवेशासाठी 304 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 6 हजार 972 प्रवेश दर्शविण्यात आले आहेत. या जागांसाठी 98 हजार 946 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यात 81 हजार 687 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-1 भरून अर्ज लॉक केले आहेत. यातील 81 हजार 261 अर्जांची तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे. 73 हजार 685 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-2 भरून महाविद्यालयांची पसंती नोंदविलेली आहे.
संभाव्य सर्वसाधारण गुणवत्ता यादी 23 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यावर ऑनलाइन आक्षेपही मागवण्यात आले होते. त्यावर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात आली होती. आता पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी पोर्टलवर दुपारी 3 वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग-इनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दिसणार आहे. विद्यार्थ्यांना मोबाइलवर “एसएमएस’ही पाठविण्यात येणार आहे. संबंधित महाविद्यालयांनाही त्यांच्या लॉग-इनमध्ये विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पहिल्या नियमित फेरीचे “कट ऑफ’ही पोर्टलवर दर्शविण्यात येणार आहेत. कला शाखेसाठी 6 हजार 752, वाणिज्यसाठी 30 हजार 732, विज्ञान शाखेसाठी 34 हजार 71, एचएसव्हीसीसाठी 1 हजार 265 अशा एकूण 72 हजार 820 विद्यार्थ्यांचा समावेश सर्वसाधारण गुणवत्ता यादीत करण्यात आला होता. इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोट्यातून 6 हजार 277 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी, अर्ज भाग-1 भरण्याची प्रक्रिया आता थांबविण्यात आलेली आहे. नियमित प्रवेशाची दुसरी फेरी 3 सप्टेंबरनंतर सुरू होणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना अर्ज भाग-1 व 2 भरणे, अपडेट करणे याची सुविधा उपलब्ध होणार आहे. वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.