परवानगी न घेता ड्रोनद्वारे सर्रास चित्रीकरण ः यंत्रणांचे दुर्लक्ष
प्रशासन म्हणते, “तक्रार द्या, संबंधितांवर कारवाई करू’
पुणे – धरणक्षेत्रात आणि शहरातील नदीपात्रावरील पुलांवर ड्रोनद्वारे सर्रास चित्रीकरण केले जात असून, त्यांना कोणीच जाब विचारत नाही, हे गेल्या काही दिवसांत दिसून येत आहे.
धरणक्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने, धरणांतील पाण्याची पातळी वाढली आहे. पानशेत, खडकवासला ही धरणे भरली असून त्यातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. या परिसरांतील वातावरण नयनरम्य झाल्याने ड्रोन घेऊन शुटिंग करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. वास्तविक धरणांच्या सुरक्षेसाठी धरण आणि त्याच्या परिसरात छायाचित्रण करण्याला किंवा चित्रीकरणाला मज्जाव आहे. तरीही वर्षा सहलीनिमित्त किंवा अन्यवेळीही गेलेले हौशी पर्यटक छायाचित्रण आणि चित्रीकरण करत असतात. परंतु काही दिवसांपासून तेथे ड्रोन उडताना दिसू लागले आहेत. येथे चित्रीकरणासाठी पाटबंधारे विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, मुळात या भागात अन्य कोणत्याही कारणास्तव हौशी कलाकारांना संबंधित परवानगी दिलीच जात नाही.
त्यामुळे सर्रास परवानगीविना हे ड्रोन सध्या उडवले जात आहेत आणि चित्रीकरण केले जात असल्याचे दिसून येत आहे. हे चित्रीकरण करून काहीजण नुसतेच थांबत नाहीत तर ते युट्युब, फेसबुक अशा सोशल माध्यमांवर ते व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे धरणांची सुरक्षितता एकप्रकारे धोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे घातपाती कारवाया करणाऱ्यांना याचे चित्रीकरण आणि या भागाची माहिती अनायसेच सोशल मीडियावर मिळत आहे, असे म्हणता येईल.
धरणक्षेत्रात हा प्रकार असला, तरी शहरातील पुलांवरही ड्रोनने चित्रीकरण होत असल्याचे अनेकदा दिसते. येथेही चित्रीकरण करण्याला परवानगी नाही. मुळात शहरात अशाप्रकारचे चित्रीकरण करायचे असेल तर पोलिसांचीही परवानगी घेणे आवश्यक आहे. बहुतांशवेळा ती घेतली जात नाही. गणेशोत्सवाच्या काळात एक दिवस तेही काही तासांपुरती परवानगी दिली जाते.
याशिवाय हल्ली काही लग्न कार्याचे, कार्यक्रमांचे शुटिंग ड्रोनद्वारे करण्याची “फॅशन’ रुजली आहे. त्यालाही तेवढ्या भागापुरती आणि काही वेळेसाठीच परवानगी दिली जाते. वास्तविक हवेत उडणाऱ्या ड्रोनवर संरक्षण खात्याची नजरही असते. त्यांच्या रडारच्या कक्षेत या उडणाऱ्या तबकड्या येतात की नाही, हा देखील प्रश्न आहे. की, त्याकडे कानाडोळा केला जातो का? हे पाहणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
ठराविक उंचीवरून चित्रीकरण करायचे असल्यास त्याला परवानगी घेणे आवश्यकच आहे. असे चित्रीकरण करताना आढळल्यास तक्रार द्यावी, संबंधितांवर कारवाई केली जाईल.
– डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी