सविंदणे (प्रतिनिधी) – सविंदणे ता. शिरूर येथे विनायक नरवडे या शेतकऱ्याच्या आई गोट फार्म मधील नर प्रजातीचे १० बोकड बिबटयाने केलेल्या हल्ल्यात ठार मारले असून ९ बोकड गंभीर जखमी केले आहे. रात्रीच्या वेळी बिबटयाने कपांऊडलगत असणाऱ्या झाडावरुन उडी मारत फार्ममध्ये प्रवेश केला. व तेथे असलेल्या बोकड या प्राण्यांवर हल्ला केला आहे. सानेन प्रजातीचे हे बोकड असून एका बोकडाची किंमत एक ते अडीच लाख रुपयांपर्यत आहे. अंदाजे एकुण पंधरा लाखांचे या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मोठ्या कष्ठाने उभ्या केलेल्या गोट फार्मवर बिबटयाने अचानक हल्ला केल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून वन विभागाने तातडीने या गोष्टीची दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. घटनास्थळी वन परीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनरक्षक ऋषिकेश लाड वनकर्मचारी हनुमंत कारकुड, वनपाल चारूशिला काटे, पशुवैदयकिय आधिकारी डॉ. गोरख सातकर, डॉ . प्रकाश ऊचाळे यांनी भेट दिली. सध्या सविंदणे येथील लंघेमळा, नरवडे मळा, किठेवस्ती, प्रगतीनगर , दाहीजावस्ती या ठिकाणी बिबटयाचे दिवसाढवळ्या दर्शन होत आहे. वनविभागाने ताबडतोब पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.