न्यासालॅंडमध्यें मोठें सशस्त्र बंड
जोहान्सबर्ग, ता. 27 : मध्य आफ्रिकेचे फेडरेशन निर्माण करण्याविरुद्ध न्यासालॅंडमधील हजारों लोकांनी सशस्त्र बंड पुकारल्याची बातमी आज सकाळी दक्षिण आफ्रिकन रेडिओवरून सांगण्यांत आली. बंडवाल्याची पोलिसांबरोबर घनघोर चकमक होऊन बंडवाल्यांचे आणि पोलिसांचे अनेक लोंक कामी आलें व जायबंदी झालें, असेंही नभोवाणीवरील वृत्तनिवेदक म्हणाला. विशेषतः चोलो या गांवांत झालेली धुमश्चक्री अत्यंत भीषण होती व तीत शेकडों आफ्रिकन लोकांनी जान कुर्बान केली.
निमित्त महारोग्यांचे!
मालामुलो या गावांतील काहीं ख्रिश्चन मिशनऱ्यांना वेढा घालून शेकडों आफ्रिकन लोकांनी गेले कित्येक दिवस अडकवून ठेवले होतें. काल एका लष्करी तुकडीनें आफ्रिकन लोकांवर गोळीबार करून मिशनऱ्यांची सोडवणूक केली. या मिशनरी लोकांनी काहीं महारोग्यांना योग्य प्रकारें औषधोपचार न केल्यामुळें आफ्रिकन लोक भडकले असावेत, असें म्हणतात.
अणुपूर्वकालीन राष्ट्रसंघाच्या सनदेंतील भयानक उणिवा
बॉस्टन, ता. 27 : ““राष्ट्रसंघाच्या सनदेंत अनेक उणिवा असून त्या सनदेची रचना अणुशक्तीचा शोध लागण्यापूर्वी झालेली आहें. अणुशक्तीच्या संहारशक्तीच्या भीषण व काळ्याकुट्ट सावलीत मानव समाजाला वावरावे लागत असून अणुशक्तीचें भय अवनीतळावरून हाकलून लावण्याचा आयसेनहॉवर सरकारनें निश्चय केलेला आहें,” असें उद्गार अमेरिकेचें परराष्ट्रमंत्री जॉन फॉस्टर डल्लस यांनी येथील वकील मंडळींच्या एका सभेंत बोलताना काढलें.
कटु फळांचा संभव …
अणुशक्तीच्या विकासाचा पाढा वाचून ते पुढे म्हणाले, “”अणुशक्तीचे भय सत्वर राष्ट्रसंघाकरवीं दूर होईल, अशी साऱ्या जगाला आशा वाटत होती. पण राष्ट्रसंघाच्या सनदेंत आवश्यक ते फेरफार केलें नाहींत, तर कटु फळे आल्याखेरीज राहणार नाहींत. आधुनिक जगातील प्रश्न सोडविण्यास राष्ट्रसंघाच्या सनदेत जरूर तेवढे सामर्थ्य नाही, हे तर आता उघडच दिसत आहे.