मांजरी ग्रामपंचायत बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना
मांजरी – करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश आरतीसाठी किंवा विसर्जनासाठी गर्दी केल्यास संबंधित कार्यकर्ते व नागरिकांवरही तत्काळ गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात करोना आढावा बैठकीत प्रसाद यांनी सूचना केल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, आरोग्य अधिकारी भगवान पवार, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, सरपंच शिवराज घुले, तलाठी मिलिंद शेटे, ग्रामसेवक एम. बी. दाते, पोलीस पाटील, अमोल भोसले आदी उपस्थित होते.
मांजरी बुद्रुक परिसरात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही सूचनाही करण्यात आल्या. दुकाने सायंकाळी सात वाजल्यानंतर बंद राहतील, ग्राहकांनी मास्क घातलेले नसल्यास ते दुकान सील करण्यात येईल. एकत्रितपणे कोठेही बसलेले आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील. मास्क नसल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येईल. विनामास्क दोन-तीन वेळा सापडल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल.
गौरी गणपतीचे सर्व कार्यक्रम घरातल्या घरातच साध्या पद्धतीने साजरे करावेत. तसेच सर्व गणपती मंडळ व सोसायटीतील गणपती यांनी आरतीसाठी 5 जणांपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, गणेश विसर्जन मिरवणूक काढू नये. अन्यथा त्या मंडळातील अध्यक्ष/उपाध्यक्षांवरही गुन्हे दाखल होतील, अशा सूचना अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षांखालील लहान मुलांनी बाहेर पडू नये, असे आवाहन सरपंच शिवराज घुले यांनी यावेळी केले आहे.