महापालिकेकडून पैशांच्या उधळपट्टीचा प्रकार समोर
येरवडा – ओला व सुका कचरा ठेवण्यासाठीच्या प्लॅस्टिक बकेट नागरिकांना वाटप करण्यासाठी पालिकेकडून खरेदी करण्यात आल्या. मात्र, या बकेट खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर ही बकेट खरेदी थांबविण्यात आली. परंतु, ज्या बकेट खरेदी करण्यात आलेल्या आहेत, त्यांचेही वाटप करण्यात आले नसल्याने लाखो रुपयांच्या बकेट धुळखात पडून आहेत.
येरवडा प्रभाग क्रमांक 3 विमाननगर या प्रभागातील बाबू जगजीवनराम विद्यालयाच्या आवारात असलेल्या पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व आरोग्य विभागाच्या कोठीत प्लॅस्टिकची बकेट पडून असल्याचा तसेच याचा वापरच न झाल्याने शेकडो बकेट खराब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याकडे नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या एकाही अधिकाऱ्याने याकडे लक्ष कसे दिले नाही? तसेच, ही बाब स्थानिक नगरसेवकांच्या लक्षात कशी आली नाही? पालिकेकडून आलेल्या वस्तू आपल्या हस्ते वाटप व्हाव्यात, यासाठी इतरवेळी प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकांनी लाखो रुपयांच्या मालमत्तेची हानी होत असताना याकडे दुर्लक्ष का केले? असे प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित होऊ लागले आहेत. याबाबत नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश बनकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
गाड्यांना गंज…
कचरा गोळा करण्यासाठीच्या गाड्या एकावर एक रचून ठेवण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या चाकावर गंज चढला आहे. या गाड्या खराब झाल्याने लाखो रुपये वाया जाणार आहेत.
कचरा वेचक स्वच्छ संस्थेचे कर्मचारी किंवा पालिकेचे सफाई कामगार यांना मागणीप्रमाणे कचरा गाड्या वापरण्यास देतो.प्लॅस्टिकच्या बकेटची मागणी सोसायटीने केल्यास त्यांना देण्यात येते. अनेकांना ते देण्यात आले आहेत.
– हनुमंत सावळी, आरोग्य निरीक्षक, नगररोड क्षेत्रीय कार्यालय