पुणे – राज्य कर विभागात निरीक्षक पदाची नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाने क्रीडापटू असल्याची बनावट कागदपत्र देऊन फसवणूक केली. याप्रकरणी भारतीय तलवारबाजी महासंघाच्या माजी सचिवासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय तलवारबाजी महासंघाचे माजी सचिव अशोक दुधारे, तुषार वसंतराव चौधरी (रा. पाटकुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्या विरोधात फसवणूक तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रीडा आणि युवक सेवा विभागाच्या पुणे कार्यालयातील प्रभारी उपसंचालक विजय संतान यांनी यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राज्य कर विभागात चौधरी निरीक्षक पदावर नोकरी मिळवण्याचा प्रयत्नात होता. क्रीडापट्टूंसाठी आरक्षण असल्याने चौधरी तलवारबाजीत प्रावीण्य मिळवल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. भारतीय तलवारबाजी महासंघाचे माजी सचिव अशोक दुधारे यांना बनावट प्रमाणपत्र सादर केले. प्रमाणपत्राची शहानिशा न करता दुधारे यांनी चौधरी याला प्रतिज्ञापत्र दिले.
क्रीडा आणि युवक सेवा विभागाकडे चौधरीने प्रतिज्ञापत्र सादर केले. प्रतिज्ञापत्राची पडताळणी करण्यात आली असता, चौधरी राष्ट्रीय पातळीवरील तलवारबाजी संघात महाराष्ट्राकडून सहभागी झाला नसल्याचे उघडकीस आले. या स्पर्धेत मणीपूर संघाने सुवर्ण पदक मिळवले होते.
मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश संघाने अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळवल्याचे उघड झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. चौधरीने बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच या कागदपत्रांची पडताळणी न करता दुधारे यांनी प्रतिज्ञापत्र तयार करून दिल्याचे उघड झाले. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करत आहेत.