तेहरान – इराणने आज आपल्या नवीन क्षेपणास्त्राचे उद्घाटन केले. जानेवारीमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या जनरल सुलेमानी यांचे नाव या क्षेपणास्त्राला देण्यात आले आहे. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा उद्योग दिन 22 ऑगस्टला असतो. त्याच्या औचित्याने हे नवीन क्षेपणास्त्र जगासमोर आणण्यात आणले जाणार आहे.
सरकारी वृत्तवाहिनीवरून इराणचे संरक्षण मंत्री अमिर हतामी यांनी देशाच्या संरक्षण सिद्धतेची माहिती दिली. त्यामध्ये या नवीन क्षेपणास्त्राची माहिती देण्यात आली. हाजी कासिम सुलेमानी असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. याशिवाय अबू मेहदी नावाचे क्रूझ क्षेपणास्त्राची माहितीही हतामी यांनी दिली. बगदाद जवळ अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यामध्ये सुलेमानी यांच्याबरोबर मेहदी हे देखील ठार झाले होते.
कासिम सुलेमानी या क्षेपणास्त्राची मारक क्षमता तब्बल 1,400 किलोमीटर पर्यंत असणार आहे. तर अबू मेहदी हे क्षेपणास्त्र 1,000 किलोमीटर दूरवरचे लक्ष्य भेदण्यास सक्षम असणार आहे. याशिवाय देशांतर्गत बनावटीच्या ड्रोनची माहितीही यावेळी देण्यात आली.
अध्यक्ष हसन रौहानी यांनी आपल्या भाषणात संरक्षण क्षेत्रात देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. इराणची घातक शस्त्रास्त्रे खूपच अचूक मारा करणारी आणि भीषण संहारक अशी आहेत. त्याबद्दल खूपच कुतुहलही निर्माण झाले आहे. राष्ट्रीय संरक्षण उद्योगाचे धोरण संरक्षण हे आहे, आक्रमण हे उद्दिष्ट नाही. एखाद्या देशाला नुकसान पोहोचवणे अथवा दुसऱ्य देशाच्या भूमीवर अतिक्रमण करणे हे इराणचे उद्दिष्ट नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.