शिरूर -शिरूर तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आल्याने शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार होमक्वारंटाइन झाले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून नागरिकांची सुरक्षितता म्हणून होम क्वारंटाइन होत असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. याबाबतचे मेसेज सोशल मीडियावर फिरत असल्याने शिरूर तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या चार महिन्यांपासून आमदार पवार हे परप्रांतीय कामगार तसेच गोरगरीब नागरिकांपर्यंत मदतीचा हात देण्यात दिवस-रात्र फिरत होते. करोना काळात ते स्वतः पुढाकार घेऊन पुण्यामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना दाखल करण्यापर्यंत सर्व कामे ते करीत आहेत. परंतु, गटविकास अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ते पाच दिवसांसाठी होम क्वारंटाइन झाले आहेत.