दिवसात 1,879 डिस्चार्ज 1,390 नवे बाधित
पुणे – मागील सात दिवसांपासून शहरात करोना बाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रविवारी दिवसभरात आणखी 1,879 जण करोनामुक्त झाले आहे. तर, नव्याने 1,390 बाधित सापडले. यामुळे शहरातील करोनामुक्तांची संख्या 48,614 वर पोहचली आहे. दरम्यान, करोनामुळे पुणे शहर-24, तर ग्रामीण व अन्य जिल्ह्यांतील 12 अशा 36 बळींची नोंद रविवारी झाली आहे.
जुलै महिन्यातील करोनाचा कहर मागील आठवड्यापासून काहीसा कमी झाला आहे. लॉकडाऊन शिथिलतेनंतर दररोज काही दिवस शहरातील नव्या बाधितांची संख्या 1,800 ते 1,900 च्या आसपास होती. मात्र, 3 ऑगस्टपासून सरासरी 500 ते 600ने नव्या बाधितांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. तर, तुलनेत करोनामुक्त व्यक्तींची संख्या वाढली आहे. या सात दिवसांत तब्बल 10,497 बाधित करोनामुक्त झाले आहेत. तर नव्याने 8 हजार 443 बाधित सापडले आहे.
शहरात आतापर्यंत 3 लाख 19 हजार 588 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 65 हजार 966 बाधित सापडले. तर त्यातील 48 हजार 614 जण करोनामुक्त झाले असून, 1 हजार 540 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
तर 15,812 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 726 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 448 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. तर 278 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. रविवारी दिवसभरात 6 हजार 8 जणांची चाचणी करण्यात आली आहे.