दिवसात तब्बल 53 अधिकाऱ्यांची “सोय’ : राजकीय “वजन’ वापरणाऱ्यांची “आघाडी’
पुणे – राज्यातील शालेय शिक्षण विभागातील एकाच कार्यालयात तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. एकाच दिवसात तब्बल 53 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची धडक मोहिम राबविण्यात आली आहे. यात काही जणांनी आपापल्या सोयीच्या ठिकाणी बदल्या करुन घेण्यात बाजी मारली हे आश्चर्यकारकच आहे.
शिक्षण विभागातील विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्तच पडली आहे. त्यामुळे काही जणांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. या ताणामुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी सतत वाढतच आहे. काही अधिकारी एकाच विभागात बरीच सर्व ठाण मांडून बसले होते. त्यांची मक्तेदारीही मोठ्या प्रमाणात वाढली होती.
काही जणांनी आपल्या मूळ गावी सोयीच्या ठिकाणी बदल्यांसाठी पूर्वी विनंती अर्जही केले होते. बऱ्याच अधिकाऱ्यांनी बदल्यांसाठी राजकीय व इतर आवश्यक ते वजन वापरण्याला प्राधान्य दिले. अखेर त्यात त्यांना यशही मिळाले आहे. दरम्यान, या बदल्यांबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव दीपक शेलार यांनी नुकतेच जारी केले आहेत. बदली रद्द करण्यासाठी कुठल्याही स्वरुपाची आवेदने सादर केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील प्राचार्य तथा उपसंचालक शोभा खंदारे यांची पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे. तसेच खंदारे यांच्या जागी प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे यांची बदली झाली आहे. सातारा येथील पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता नामदेव शेंडकर यांची पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बदली झाली आहे. सोलापूरमधील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक अमोल पवार यांची प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयात बदली करण्यात आली आहे. सोलापूरच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता राजेंद्र वाकडे यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पुणे कार्यालयात बदली झाली आहे.
अशी आहे बदल्यांची संख्या
राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे 4 प्राचार्य, 17 वरिष्ठ अधिव्याख्याता, प्राथमिक व माध्यमिकच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकातील 12 अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. विविध शिक्षण विभागातील 20 अधीक्षकांचाही बदल्यांमध्ये समावेश आहे. यातही शालेय पोषण आहार विभागातील 9 अधीक्षकही यात समाविष्ट आहेत.