कॅलिफोर्निया – कॅलिफोर्नियामध्ये भडकलेल्या वणव्यामुळे रिव्हरसाईड प्रांतातील 8 हजार जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रणाबाहेर गेलेली ही आग 12,000 एकराहून अधिक भागात पसरली आहे.
या वणव्याला स्थानिक नागरिकांनी “ऍपल फायर’ असे नाव दिले आहे. या वणव्यामुळे आजूबाजूच्या भागात अनेक ठिकाणी छोट्या छोट्या आगी लागल्या आहेत. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून ही आग मोठ्या व्यापक भूभागावर पसरली आहे.
सर्वात प्रथम ही आग लॉस एंजेलिसच्या पूर्वेकडील 75 मैल अंतरावरील कॅलिफोर्नियातील चेरी खोऱ्यामध्ये पसरली. “ऍपल फायर’ आता 12,000 एकरवर पसरली आहे, असे रिव्हरसाइड काउंटीच्या अग्निशमन विभागाने रविवारी सकाळी पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या नागरिकांच्या स्थलांतराच्या प्रक्रियेला शुक्रवार संध्याकाळपासूनच सुरूवात करण्यात आली आहे. मोरोंगो रोडच्या उत्तरेस, मिलार्ड कॅनियन रोडच्या पूर्वेस आणि व्हाईट वॉटर कॅनियन रोडच्या पश्चिमेच्या नागरिकांना स्थलांतरासाठी नव्याने आदेश जारी केले आहेत. अंदाजे अडीच हजार घरांमधील 8 हजार नागरिकांना तातडीने स्थलांतरित करण्यात येत आहे.