पेठ- सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील कुरवंडी येथील श्रीक्षेत्र वेळेश्वर मंदीर हे दर्शन घेण्यासाठी बंद ठेवण्यात आले असून भाविकांनी वेळेश्वर डोंगरावर येऊ नये, यासाठी रस्ता बंद करण्यात आल्याची माहिती कुरवंडी ग्रामस्थांनी दिली आहे.
सातगाव पठार, घोडेगाव व खेड तालुक्यांतील भाविक येथील श्री वेळेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त मोठ्या संख्येने येत असतात, त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील वेळेश्वर डोंगराच्या पायथ्याचा रस्ता सील केला आहे. कुरवंडी गावाच्या पश्चिमेला 450 फूट उंचीवर निसर्गरम्य परिसरात श्रीक्षेत्र वेळेश्वर मंदिर आहे. येथूनच वेळ नदीचा उगम होत आहे.या डोंगरावर निसर्गाच्या सान्निध्यात अनेक पर्यटक, भाविक येत असतात. ही बाब लक्षात घेऊन कुरवंडी ग्रामस्थांनी डोंगरावर जाणारे रस्ते बंद केले आहेत.
सध्या करोनाचा वाढता प्रभाव पाहता सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद देवण्यात आली आहेत. येथे पर्यटकांना निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी डोंगरावर मोठे मैदान आहे. एक पाण्याची विहीर आहे. सुंदर व प्रशस्त मंदिर, सभामंडप आहे. परिसरातील निसर्गाचे विहंगम दृश्य या डोंगरावरून दिसते; सध्या करोनामुळे डोंगरावर पर्यटकांनान आणि भाविकांना जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे.