पुणे : करोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत आहेत. सह्याद्री वाहिनीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी “टिलीमिली’ ही दैनंदिन मालिका दाखविण्यात येत आहे. मालिकेच्या ऍप विक्री आणि त्याची जाहिरात करण्यास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे या उपक्रमाचा बाजार भरवण्याच्या उद्देशांचे मनसुबे उधळले आहेत.
एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन संस्थेने दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर मोफत स्वरूपात विद्यार्थ्यांसाठी “टिलीमिली’ ही दैनंदिन मालिका 20 जुलैपासून सुरू केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे मार्ग उपलब्ध नाहीत, त्यांना टीव्हीद्वारे शैक्षणिक कार्यक्रम पाहता यावे या भूमिकेतून शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद त्यांना आवश्यक मदत करत आहे. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनासोबत स्वयंसेवी संस्था देखील काम करत आहेत.
“टिलीमिली’ कार्यक्रमावेळी कार्यक्रमाचे ऍप विकत घेण्याची जाहिरात केली जाते असे निदर्शनास आले आहे. ऍप विकण्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयाने अथवा शासनाने कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही व ऍप विक्री पुरस्कृत करण्यात आलेले नाही. यामुळे राज्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी ऍप विकत घेण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाइन शिक्षणासाठी राज्यातील शिक्षक, विद्यार्थी यांना मोफत स्वरुपात उपलब्ध असलेले दीक्षा ऍप, जिओ टी.व्ही. ऍप, जिओ सावन ऍप, युट्यूब ऍप, शाळेतर्फे घेण्यात येणाऱ्या व्हिडीओद्वारे ऑनलाइन तासिका या सर्व सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध असल्याने “टिलीमिली’ कार्यक्रमाचे ऍप विकत घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. याबाबत राज्यातील शाळा, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना माहिती अवगत करून देण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.