हवेली, खेड, मुळशी, दौंड, मावळचा समावेश; पाच हजारांचा टप्पा पार
पुणे – परदेशांतून पुण्यात आलेला करोना विषाणू गाव-खेड्यांमध्ये पोहोचला आहे. यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या दहा दिवसांत जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे.
ग्रामीण भाग आणि नगरपरिषद हद्दींत बाधितांची एकूण संख्या तब्बल 5 हजार 84 वर पोहोचली आहे. त्यामध्ये एकट्या ग्रामीण भागात 3 हजार 929 बाधित असून, हवेली तालुक्यांत सर्वाधिक 1,608 तर खेड तालुक्यात 480 बाधित संख्या आहे. त्यामुळे हवेली, खेड, मुळशी, दौंड, शिरूर आणि मावळ हे करोनाचे “हॉटस्पॉट’ झाले आहेत.
मंगळवारी (दि.21) जिल्ह्यात सर्वाधिक 295 बाधित सापडले. त्यामध्ये हवेली-97, मावळमध्ये पहिल्यांदाच 46 बाधित सापडले. तर, खेड-35, मुळशी-26, इंदापूर-22, जुन्नर-21, दौंड-13, पुरंदर-16 बाधित सापडले. बारामती, भोर, वेल्हा, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांत 1 ते 7 दरम्यान बाधित सापडले.