पुरातत्व विभागाने मांडली होती सामाजिक दायित्वांतर्गत संकल्पना : कर्मचारी उपलब्ध करणार
पुणे – गडकिल्ल्यांच्या संवर्धनात सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवला आहे. पुरातत्त्व खात्याच्या पुढाकाराने सामाजिक संस्थेला सहभागी करून गडकिल्ल्यांचे जे संवर्धन होत आहे, त्याला यश मिळत आहे. याच उपक्रमांतर्गत चिंतामणी ज्ञानपीठ शिक्षण संस्थेने तोरणा किल्ल्याची जबाबदारी उचलली आहे.
संस्थेचे अध्यक्ष आणि महापालिका शिक्षणमंडळाचे माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब रेणुसे यांनी या गडासाठी कर्मचारी उपलब्ध करून देत त्यांच्या मासिक वेतनाची जबाबदारी स्वीकारली आहे. वेल्हे परगण्यातील “प्रचंडगड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या “तोरणा गडा’ची स्वराज्याचे तोरण म्हणून देखील ओळख आहे. शिवछत्रपतींनी बांधलेल्या या गडाचे ऐतिहासिक महत्त्व आजही तितकेच उत्तुंग आहे.
“पुरातत्व विभागाने सामाजिक दायित्वांतर्गत या गडाचे देखभालीची संकल्पना मांडली असता, चिंतामणी ज्ञानपीठ शिक्षण संस्थेने यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला नुकतीच मान्यता मिळाली असल्याने या संस्थेने पुरातत्व विभागावर आर्थिक भार न टाकता स्वनिधीतून कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे तोरणा गडावरील इतिहासकालीन मंदिरे आणि गड परिसराच्या देखभालीचा मुख्य प्रश्न सुटला आहे. तसेच अशा उपक्रमातून अतिरिक्त मनुष्यबळ, कर्मचारी उपलब्ध होत आहेत,’ असे पुरातत्त्व विभागाचे सहायक उपसंचालक विलास वाहणे सांगितले.
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातून गडकिल्यांचे संवर्धनासाठी लोक पुढे येऊ लागल्याने गडदुर्गांसाठी एक आशादायी चित्र निर्माण झाले आहे. राज्यभरातील लोकांनी या उपक्रमासाठी योगदान देण्याची आवश्यकता आहे.
– पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक