नवी दिल्ली – जगभरातील बड्या लोकांचे ट्विटर खाते गेल्या आठवड्यात हॅक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे हॅकिंग केवळ चार तरुणांनी केले असल्याचे वृत्त काही वृत्त माध्यमांनी दिले आहे. ट्विटरची 130 मोठ्या लोकांची अकाउंट हॅक करण्यात आली आणि या अकाऊंटच्या माध्यमातून त्यांच्या फॉलाअर्सना बिटकॉइनमध्ये पैसे गुंतविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेतील एफबीआयसह जगभरातील विविध चौकशी संस्था चौकशी करू लागल्या आहेत.
अमेरिकेतील एका वृत्तपत्राने म्हटले आहे की. हॅकर्सचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता चार तरुणांनी हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. यातील एका तरुणाला ट्विटरच्या संवेदनाशील उपकरणांची माहिती होती. त्या आधारे हॅकिंग करण्यात आल्याचे बोलले जाते. जगभरातून या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जात असली तरी हे हॅकिंग कोणी केले यासंदर्भात ट्विटरने अद्याप तरी औपचारिक माहिती जारी केलेली नाही.
अमेरिकेतील वृत्त माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणांनी हॅकिंगच्या अगोदर आणि नंतरही परस्परांशी संपर्क साधून काही प्रमाणात समन्वयाने हे काम केले असल्याचे आढळून येते. कोणीतरी आपल्या व्यवस्थेत घुसखोरी करून हे करू शकले एवढे मात्र ट्विटरने मान्य केले आहे. ज्या बड्या लोकांची खाती हॅक करण्यात आली, त्यांच्या संदेशाशिवाय त्यांची इतर वैयक्तिक माहिती पळवली आहे का याची शहानिशा करण्यात येत आहे, असे ट्विटरने जारी केलेल्या मर्यादीत माहितीत म्हटले आहे.
90 लाख रुपयाचे नुकसान
23 जुलै रोजी बड्या नेत्यांची खाती हॅक करण्यात आली. या या नेत्यांनी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन केल्याचे भासविण्यात आले. याला जगातील 367 लोक बळी पडले आणि त्यांनी 90 लाख रुपये गमावल्याचे आढळून आले. जर या हॅकर्सनी आणखी दुसरी एखादी युक्ती केली असती तर यापेक्षाही जास्त रक्कम गमावली गेली असती. त्यामुळे जगभरातील सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या मनामध्ये तणाव निर्माण झाला आहे.