अल्कोहोल आधारित सॅनिटायझरबाबत न्यायाधिकरणाचा निर्वाळा
नवी दिल्ली : करोना व्हायरसमुळे देशभरात आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाशी लढा देण्यासाठी हॅंड सॅनिटायझरचा मोठा उपयोग होतो. काही अल्कोहोल निर्मात्या कंपन्यांनी या काळात पुढाकार घेऊन अल्कोहोल आधारित हॅंड सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. मात्र, त्या सॅनिटायझरवर 18% जीएसटी लागेल असा निकाल एका न्यायाधिकरणाने दिला आहे.
स्प्रिंग फिल्ड इंडिया डिस्टिलरी या कंपनीने अल्कोहोल आधारित हॅंड सॅनिटायझरचे उत्पादन करून विक्री केली आहे. मात्र, या संदर्भात किती जीएसटी असावा या संदर्भात पेच निर्माण झाल्यानंतर या कंपनीने स्पष्टीकरणासाठी अॅथॉरिटी फॉर ऍडव्हान्स रुलिंगच्या गोवा खंडपीठाकडे विचारणा केली. यावेळी ऍथॉरिटीने सांगितले की, या कंपनीने अल्कोहोल आधारित सॅनिटायझर तयार केले आहे. या हॅंड सॅनिटायझरवर 18% जीएसटी लागेल, असे सांगितले. या कंपनीने इतर सॅनिटायझरप्रमाणे 12 टक्के जीएसटी असावा, असा युक्तिवाद केला होता.
सरकारने सॅनिटायझरला अत्यावश्यक वस्तू म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे या सॅनिटायझरवर जीएसटी रद्द होतो का, या संदर्भातही विचारणा कंपनीने केली होती. कंपनीने केलेल्या युक्तिवादाला विचारात घेतल्यानंतर ऍथॉरिटीने सांगितले की, हे हॅंड सॅनिटायझर अल्कोहोल आधारित असल्यामुळे त्यावर 18% जीएसटी लागेल. त्याचबरोबर ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हॅंड सॅनिटायझरना जरी अत्यावश्यक वस्तू यादीमध्ये समाविष्ट केले असले, तरी जीएसटी कायद्याप्रमाणे ज्या वस्तूला कर लागत नाही, अशा वस्तूंची यादी वेगळी आहे. या यादीमध्ये अल्कोहोल आधारित हॅण्ड सॅनिटायझरचा उल्लेख नाही. अशा प्रकारच्या सॅनिटायझरवर नेमका किती कर घ्यावा या विषयावर उत्पादक व कर विभागाच्या अधिकाऱ्यांदरम्यान मतभेद निर्माण झाले आहेत. त्यावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.
सरकारने स्पष्टीकरण करण्याची गरज
अॅथॉरिटीने दिलेल्या या निर्णयानंतर कर विश्लेषकांनी सरकारने या विषयावर स्वच्छ स्पष्टीकरण करण्याची गरज आहे, अन्यथा अशा प्रकारचे कायदेशीर प्रश्न निर्माण होतील, असे म्हटले आहे.
ई वाय टॅक्स या कंपनीचे अधिकारी अभिषेक जैन म्हणाले की, हॅंड सॅनिटायझरचा समावेश कोणत्या वर्गात करावा, याबाबत सुरुवातीपासून मतभेद आहेत. सध्याच्या परिस्थितीत सॅनिटायझरची गरज आहे. त्यामुळे अनेक कंपन्या या उत्पादनात उतरल्या आहेत. त्यामुळे सरकारने यावर स्पष्टीकरण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.