नोंदणी व मुद्रांक विभागाने उपलब्ध केली सुविधा
पुणे – सदनिका, जमीन बॅंकेमध्ये तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले तर कर्जदार व्यक्तीला दुय्यम निबंधक यांच्याकडे “नोटीस ऑफ इंटिमेशन’ दाखल करावी लागते. करोनाच्या पार्श्वभूमीवर “नोटीस ऑफ इंटिमेशन’ ही सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने ई फायलींग प्रणालीत बदल केला आहे.
कर्ज घेताना जर साध्या गहाणाच्या पद्धतीने कर्ज घेतले तर त्यासाठीचे गहाणखत दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदवावे लागते, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इक्विटेबल मॉर्गेज ही दुसरी एक पद्धत आहे. ज्यामध्ये कर्जदार तारण म्हणून आपल्या सदनिका, जमीन अशा स्थावर मिळकतीच्या मालकी हक्काची कागदपत्रे जसे की खरेदीखत, विक्री करारनामे संबंधित बॅंकेच्या ताब्यात देतो. कर्ज फिटेपर्यत ही कागदपत्रे बॅंकेकडे राहतात. या पद्धतीने कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना दुय्यम निबंधक यांच्याकडे “नोटीस ऑफ इंटिमेशन’ दाखल करावी लागते. त्यासाठी कर्जदारास दुय्यम निबंधक कार्यालयात स्वत: हजर राहावे लागते. अथवा ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले , त्या बॅंकेच्या शाखेकडून इ-फायलींग प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन फायलींग करता येते.
मात्र ही ई-फायलींग सुविधा तुरळक बॅंकांनीच आपल्या कर्जदारांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बहुतांशी कर्जदारांना दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊनच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कर्जदारास स्वत:ची नोटीस स्वत: ऑनलाइन फायलींग करता येईल, अशी ई फायलींग ही सुधारित प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चार जिल्ह्यांकरिताच प्रणाली लागू…
ही प्रणाली सध्या पुणे शहर, पुणे ग्रामीण, मुंबई आणि मुंबई उपनगर या चार जिल्ह्यांकरिताच लागू करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी लवकरच ती लागू करण्यात येणार आहे. ही प्रणाली कशी वापरावी यांची माहिती पुस्तिका देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ही प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सर्व्हिसेस या सदराखाली ई फायलींग (नागरिक) या नावाने उपलब्ध आहे.