पुणे – राज्यातील मेडिकल कॉलेजांमध्ये पदव्युत्तर पदवी; तसेच पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दुसरी निवड यादी सोमवारी जाहीर केली आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना दि.7 ते 14 जुलैपर्यंत निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.
राज्य कोट्याअंतर्गत राज्यातील सरकारी आणि खासगी कॉलेजांमध्ये एमडी, एमएस अशा पदव्युत्तर पदवी; तसेच पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना “नीट’ पीजी प्रवेश परीक्षेच्या गुणांवर प्रवेश दिला जातो. सीईटी सेलने सोमवारी प्रवेशाची दुसरी निवड यादी जाहीर केली. या यादीनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे आणि शुल्काच्या आधारावर त्यांची निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. पहिली निवड यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती.
त्यानंतर काही प्रवेश रिक्त राहिले आहेत. या रिक्त झालेल्या जागांसाठी दुसरी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. याबाबतचे प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने आज प्रसिद्ध केले आहे. या प्रवेशाची माहिती राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.