मुंबई – अमेरिकेने एच1-बी व्हिसावर निर्बंध घातले असूनही इन्फोसिस आणि टीसीएस या कंपन्यांसह माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरमध्ये शुक्रवारी सुधारणा झाली. इन्फोसिस कंपनीचा शेअर 7 टक्क्यांनी वाढला.
शुक्रवारी जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले. त्यामुळे भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक वाढले. बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 329 अंकांनी म्हणजे 0.94 टक्क्यांनी वाढून 35,171 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 94 अंकांनी वाढून 10,383 अंकांवर बंद झाला.
इन्फोसिस आणि टीसीएस बरोबरच इंडसइंड बॅंक, ओएनजीसी, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर आयटीसी, बजाज फायनान्स, कोटक बॅंक, सन फार्मा या कंपन्यांना विक्रीचा फटका बसला. याबाबत बोलताना एमके मालमत्ता व्यवस्थापन या संस्थेचे जोसेफ थॉमस म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यापासून निर्देशांकांत वाढ होत असली तरी बहुतांश गुंतवणूकदार सावध आहेत. करोना व्हायरस, भारत- चीन संबंध, चीन-अमेरिका संबंध या घडामोडीचा निर्देशांकांच्या आगामी वाटचालीवर परिणाम होणार आहे.