जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड शहरातील नगर रोडवरील पोकळे वस्तीवरील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात दोन अल्पवयीन आरोपींना जेरबंद केले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी कर्जत व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
फिर्यादी सुदाम रोहीदास पोकळे यांच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी पहाटे घरफोडी केली होती. चोरटे पाठीमागचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने तोडून घरात घुसले होते. यावेळी घरातील सर्व झोपेत असताना चोरट्यांनी देवघराच्या खोलीत लोखंडी कपाटातील साडेचौदा तोळे सोन्याचे दागिने व दोन लाख रुपये रोख असा एकुण चार लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी देखील भेट दिली होती. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे या गुन्ह्याच्या तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार कर्जतमधील बेलगाव व आष्टीतील रुई नालकोल येथील दोन अल्पवयीन मुलांनी हा गुन्हा केल्याचे समजले. त्यावरून दोघांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमालापैकी दोन लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केले.