दोन दिवसांत पाच गावांत आढळले डझनभर रुग्ण ; 57 जणांचे स्वॅब तपासणीस पाठवले
लोणी काळभोर – हवेली तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांत करोनाने धुमाकूळ घातला आहे. थेऊर, उरुळी कांचन, लोणी काळभोर, कोरेगाव मूळ व कुंजीरवाडी या पाच गावांत तब्बल बारा रुग्ण आढळूुन आले आहेत. यातील सहा रुग्ण एकट्या थेऊर गावातील आहे. त्यामुळे पूर्व हवेली तालुका करोनाचा हॉटस्पॉट झाला आहे.
आरोग्य विभागाने वरील बारा करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व मित्र अशा 57 जणांचे स्वॅब करोना तपासणीसाठी लोणी काळभोर येथील करोना केअर सेंटरच्या माध्यमातून आज (मंगळवारी) सकाळी पाठवले आहेत.
“मागील दोन दिवसांत पूर्व हवेलीत मोठ्या प्रमानात रुग्ण आढळून आल्याने, करोनाचा धोका कैकपटीने वाढला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क लावणे गरजेचे आहे; मात्र बरेचसे नागरिक घराबाहेर पडताना मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी न घेतल्यास, भविष्यात करोनाचा आकडा याहूनही अधिक वाढू शकतो.
-डॉ. डी. जे. जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी हवेली
हवेली तालुका आरोग्य विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव परिसरातील हॉटेल चालक व थेऊर येथील रहिवासी असलेला एक 27 वर्षीय तरुण सर्वप्रथम करोना बाधित असल्याचे आढळुन आले होते. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या बारा जणांपैकी, या तरुणाचे वडील व तीन भाडेकरु असे चार जण सोमवारी (दि. 22) बाधित झाल्याचे निष्पन्न झाले. थेऊर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील एका कंपनीतही करोना बाधित रुग्ण आढळून आला. कुंजीरवाडी ग्रामपंचायतींच्या हद्दीत सोमवारी दिवसभरात दोन रुग्ण आढळले. या दोन रुग्णांच्या समवेत लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यास करोनाची लागण झाल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाले.
कोरेगाव मूळ हद्दीत एक महिला व एक पुरुष असे दोन जण बाधीत असल्याचे निष्पन्न झाले. तर आज उरुळी कांचन हद्दीतील डाळींब रस्ता परिसरात एक पंचवीस वर्षीय तरुण करोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पाच गावांत अवघ्या दोन दिवसांत करोनाचे 12 रुग्ण आढळून आल्याने, आरोग्य यंत्रणा मात्र सतर्क झाली आहे.