जळोची -बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालय व महिला ग्रामीण रुग्णालयामार्फत टाळेबंदीच्या काळात ही गर्भवती महिला व बालकांचे नियमित लसीकरण व तपासणी सेवा सुरू ठेवण्यात आली होती. या काळात आतापर्यंत 1 हजार 440 गर्भवती महिलांची तपासणी व 8 हजार 661 बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. तर महिला ग्रामीण रुग्णालयात मार्च ते जूनपर्यंत 1 हजार 703 प्रसूती झाली असून यामध्ये 1 हजार 182 नैसर्गिक तर 521 सिझेरियन प्रसूती झाल्या आहेत.
करोनाच्या भीतीपोटी अनेक गरोदर माता व बालकांचे पालक रुग्णालयात जाऊन तपासणी व लसीकरण करून घेण्यास टाळत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांची ही अडचण लक्षात घेता रुग्णालयाबरोबरच घरोघरी जाऊन लसीकरण केले. टाळेबंदीत गर्भवती महिला व बालके आरोग्य सेवेपासून वंचित राहू नयेत, यासाठी टाळेबंदीतही नियमित तपासणी व लसीकरण सेवा सुरू ठेवल्याने दोन्ही रुग्णालयाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
नियमित गर्भवती महिला तपासणी व बालकांच्या लसीकरणावर करोनाचा फारसा परिणाम झाला नाही. शासन आदेशानुसार 90 टक्के तपासणी व लसीकरण करण्यात आले आहे.
– डॉ.सदानंद काळे, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, बारामती