यवत – दौंड तालुक्यातील पडवी गावच्या हद्दीतील गायकवाड मळा येथे दोन चुलत भावांमध्ये झालेल्या किरकोळ कारणावरून एका चुलतभावाने दुसऱ्या चुलतभावाच्या छातीवर चाकूने वार करीत खून केल्याची घटना घडली. या घटनेत पोपट वसंत गायकवाड (वय ३५ वर्षे) यांचा गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना (दि.१) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर यवत पोलिसांनी आरोपी खंडु उर्फ रमेश विष्णु गायकवाड (रा.गायकवाड मळा पडवी, ता. दौंड) यास ताब्यात घेत अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व मयत हे दोघे चुलतभाऊ आहेत. या दोघांमध्ये सोमवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपी खंडू गायकवाड याने पोपट गायकवाड यांच्या छातीवर धारदार चाकूने वार केले. या घटनेत पोपट गायकवाड गंभीर जखमी झाले.
यानंतर जखमीला केडगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेहण्यास आले. परंतु पोपट गायकवाड यांना उपचारापूर्वीच तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले. सुर्यकांत लक्ष्मण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी खंडू गायकवाड यास ताब्यात घेत अटक केली आहे.
घटनास्थळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी भेट देत पाहणी केली. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र घाडगे करीत आहेत.