कलेढोण (प्रतिनिधी) – आतकरी मळ्यापाठोपाठ साळुंखे मळा येथे शुक्रवारी दोन करोनाबाधित सापडल्यामुळे संपूर्ण कलेढोण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.साळुंखे मळ्यातील 42 वर्षीय पती व 32 वर्षीय पत्नी असे दोन करोनाबाधित सापडल्यामुळे कलेढोण परिसरात खळबळ उडाली. हे दाम्पत्य दि.24 मे रोजी मुंबईतून खासगी वाहनाने साळुंखे मळा येथे आपल्या घरी आले.
त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले. त्यानंतर 26 मे रोजी त्या दोघांनाही त्रास जाणवू लागल्याने येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर दि. 28 मे रोजी जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. तेथून त्यांच्या स्त्रावाचे नमुने सातारला तपासणी पाठवण्यात आले असता त्यांचा शुक्रवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या दोघांच्या संपर्कामध्ये 10 जण आले आहेत.
यामध्ये खासगी वाहनाचा 40 वर्षीय चालक तसेच घरातील नऊ व्यक्तींचा समावेश आहे. तर लो रिस्क मध्ये 11 व्यक्तींचा समावेश आहे. त्यामध्ये एका किराणा दुकानदाराचा समावेश असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गटविकास अधिकाऱ्यांनी कलेढोण गावचा समावेश बफर झोन व साळुंखे मळा कंटेनमेंट झोनमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिला. यापूर्वी आतकरी मळा येथील एक महिला करोनाग्रस्त आहे. आता बाधित व्यक्तींची संख्या 3 झाली आहे.
साळुंखे मळा येथील त्यांच्या संपर्कात 21 जण आल्याने कलेढोण परिसरासाठी हा विषय चिंतेचा बनला आहे. कलेढाण व परिसरात बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असल्याने करोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना काटेकोर पाळा व करोनावर विजय मिळवावा, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून व करोना कमिटीने केले आहे. यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे व पोलीस पाटील तसेच उपसरपंच व सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.