रोजच नवे घोटाळे; 92 लाखांच्या साहित्यावरून अडकविण्याची भाषा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात घोटाळ्यांचे पर्व सुरू आहे. त्यातच आता 92 लाखांचा घोटाळा समोर आला आहे. करोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत आहेत. आवश्यकता नसतानाही तब्बल 92 लाखांचे साहित्य खरेदी केले आहे. हे साहित्य ठरविलेल्या स्पेशिफिकेशन ऐवजी वेगळ्याच स्पेशिफिकेशनचे पुरविण्यात आले आहे. असे असतानाही हे साहित्य घ्यावे यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरने महिला अधिकाऱ्यावर दादागिरी करत अडकविण्याची धमकी दिल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. आर्थिक स्वार्थासाठी प्रमाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार वाढल्याचे समोर येत आहेत.
ठेकेदार आणि बायोमेडिकल इंजिनिअर तज्ज्ञ कमिटीवर दबाव आणून करोडो रुपयांची खरेदीची कामे काढत आहेत. विशेष म्हणजे ज्या विभागासाठी खरेदी केली जात आहे, त्या विभागाची गरज आहे की नाही? हे देखील पाहिले जात नाही. असा प्रकार रेडिओलॉजी डिपार्टमेंट मध्ये घडला आहे. करोनाच्या आयसोलेशन वॉर्डासाठी 92 लाखांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये पाच पोर्टेबल आणि दोन डिजिटल पोर्टेबल एक्सरे मशीनचा समावेश आहे.
वायसीएमकडून डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या स्वाक्षरीने या खरेदीची मागणी भांडार विभागाकडे स्पेशिफिकेशनसह नोंदविण्यात आली. यानंतर भांडार विभागाने 97 लाख 6 हजारांची निविदा प्रसिद्ध केली. ठेकेदाराने 92 लाखांमध्ये या मशीन देण्याचे मान्य करत निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदवून महापालिकेशी करारनामा केला. मात्र निविदेतील स्पेशिफिकेशन परस्पर बदलत वेगळ्याच मशीन महापालिकेला दिल्या. या मशीन आयसोलेशन वॉर्डासाठी घेतलेल्या असतानाही रेडिओलॉजी डिपार्टमेंटला ताब्यात घेण्यासाठी आग्रह धरण्यात आला.
मात्र, आमची मागणी नसताना तसेच स्पेशिफिकेशन बदलले असल्यामुळे आम्ही या मशीन ताब्यात घेणार नाही, असे येथील महिला अधिकाऱ्याने कळविले. ठेकेदाराची तळी उचलणाऱ्या बायोमेडिकल इंजिनिअरचे मशीन चांगल्या दर्जाचे असल्याचे लेखी देत या मशीन ताब्यात घेण्यासाठी दादागिरी सुरू केली. यानंतरही संबंधित विभागाने मशीन न घेण्याची भूमिका घेत तज्ज्ञ समितीने त्या ताब्यात घ्याव्यात आम्ही चुकीचे काम करणार नाही असे कळविले. यामुळे भडकलेल्या या इंजिनिअरने थेट अडकविण्याची धमकी दिली. यानंतरही संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मशीन ताब्यात न घेता स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे.
भूमिका संशयास्पद
गरज नसतानाही या मशीन खरेदी का करण्यात आल्या? या मशीन आयसोलेशन वॉर्डासाठी असतानाही रेडिओलॉजी डिपार्टमेंटकडे का पाठविण्यात आल्या? स्पेशिफिकेशन बदलले असल्यास त्या ताब्यात घेण्यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरचा आग्रह का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले असतानाही तज्ञ समितीतील काही सदस्य हे देखील मशीन ताब्यात घेण्यासाठी आग्रह धरत असल्याने त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मशीन बंद पडत असल्याचा लेखी दावा
ज्या मशीन ताब्यात घेण्याचा आग्रह धरला जात आहे, त्या कंपनीच्या मशीन यापूर्वी वायसीएममध्ये घेण्यात आल्या आहेत. या मशीन सातत्याने बंद पडत असल्याने या मशीन ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. तज्ज्ञ समितीला दिलेल्या पत्रात मशीन बंद पडत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
फौजदारी स्वरुपाचा गुन्हा
ठरविलेल्या स्पेशिफिकेशनशिवाय इतर साहित्य घेतल्यास ही महापालिकेची फसवणूक ठरणार असून, असा प्रकार केल्यास तो फौजदारी स्वरुपाचा गुन्हा ठरणार आहे. मात्र, यापूर्वी केलेले अनेक प्रकार बिनदिक्कतपणे खपून गेल्यामुळे बायोमेडिकल इंजिनिअरचा दबाव आणि दादागिरी सुरू असल्याचे सांगण्यात आले. या बायोमेडिकल इंजिनिअरने असे अनेक प्रकार वायसीएम रुग्णालयासह वैद्यकीय विभागात केले आहेत. यापूर्वी झालेली खरेदी आणि दुरुस्तीसाठी घेतलेल्या करोडो रुपयांच्या साहित्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
करोनाच्या नावाखाली जिजामाता अन् भोसरीही
करोनाच्या नावाखाली करण्यात आलेल्या खरेदीमध्ये जिजामाता आणि भोसरी रुग्णालयासाठीही मशीन खरेदी करण्यात आल्या. 32 लाखांचे एक डिजिटल पोर्टेबल मशीन जिजामातासाठी खरेदी करण्यात आले आहे. तर एक पोर्टेबल एक्सरे मशीन भोसरीसाठी खरेदी करण्यात आले. या दोन्ही रुग्णालयांत करोनाचा एकही रुग्ण नसताना चाळीस लाखांची उधळपट्टी करण्यात आली. खोटी आणि जाणीवपूर्वक खरेदी करणाऱ्या तज्ज्ञ कमिटीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
बोगस ऍथोरायझेशन लेटर?
ज्या पद्धतीचे स्पेसिफिकेशन ठरविले जातात त्या साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे ऍथोराजझेशन लेटर निविदे सोबत जोडावे लागते. या निविदेतही लेटर जोडण्यात आले आहे. जर कंपनीने स्पेसिफिकेशनचे ऍथोराईज लेटर जोडले होते तर ती कंपनी बंद असताना लेटर मिळाले कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद असल्याने दुसरे साहित्य मिळाल्याचा दावा बायोमेडिकल इंजिनिअरने केला आहे. त्यामुळे निविदेसोबतचे लेटर बोगस असण्याची शक्यता आहे.
दमबाजी केली नाही – लोंढे
मशीन ताब्यात घ्याव्यात यासाठी आपण कोणताही दबाव आणला नसून दमबाजी केलेली नाही. मशीनचे स्पेसिफिकेशन बदलले आहेत ही वस्तुस्थिती असून तसेच त्याचे दर आणि बदललेल्या स्पेशिफिकेशनसह मशीन ताब्यात घ्याव्यात यासाठी आपण लेखी पत्र दिले आहे, हे मान्य आहे. पत्र चुकीचे असल्यास त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल, अशी प्रतिक्रिया बायोमेडिकल इंजिनिअर सुनील लोंढे यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.