केळघर (वार्ताहर) – गवडी, ता. जावळी येथील करोनाबाधिताच्या संपर्कातील 35 वर्षांच्या युवकाचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुका प्रशासन व आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांनी करोनामुक्त झालेल्या तालुक्यात करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
गवडी येथील 19 वर्षीय युवक कोपरखैरणे (नवी मुंबई) येथून गेल्या आठवड्यात शनिवारी (दि. 16) मामासमवेत आजोळी आला होता. त्याच्यात करोनाची लक्षणे सुरू झाल्याने त्याला गावातील 35 वर्षांचा युवक गुरुवारी (दि.21) रिक्षाने केळघर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आला होता. त्या 19 वर्षाचा युवक करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्या पाठोपाठ आता 35 वर्षांच्या युवकाचा अहवालही काल (दि. 23) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने गवडी व केळघर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्याच्या सहवासात किती जण आले आणि त्याने कुठे कुठे प्रवास केला असेल, याची चिंता नागरिकांना आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी तपासणी सुरू आहे. तालुका नुकताच करोनामुक्त झाला असतानाच, नवी मुंबई, मुंबईतून बरीच मंडळी तालुक्यात येत आहेत. त्यांच्यामुळे करोनाचा फैलाव वेगाने होण्याची भीती व्यक्त होत आहे.