पिंपरी (प्रतिनिधी) – मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यंदाची ईद ही खऱ्या अर्थाने गरजूंना मदत करणारी ईद ठरत आहे. लॉकडाऊन शिथिल होऊन दुकाने उघडण्यास परवानगी मिळालेली असताना देखील दरवर्षीच्या तुलनेत यंदा मुस्लीम बांधवांचा नवे कपडे व इतर वस्तू खरेदी करण्यात खूप कमी आहे. यंदाची ईद हे नवीन कपडे न खरेदी करता गरजूंना मदत करुन साजरी करण्याचा कित्येक मुस्लिम कुटुंबानी निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा मशिदीमध्ये न जाता घरोघरी नमाज पठण करून रमजान ईद साजरी केली जाणार आहे. ईदनिमित्त खास बनविण्यात येणाऱ्या शीरखुरम्यासाठी आवश्यक सुकामेवा आणि शेवया यांची खरेदी करताना आज मुस्लीम बांधव दिसत होते. यंदा काही मुस्लीम बांधवांनी ईदसाठी कपडे न घेता गरिबांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.
रमजानच्या महिन्यात मुस्लीम बांधव संपूर्ण महिनाभर रोजे (उपवास) करतात. हे रोजे रमजान ईदच्या दिवशी सोडले जातात. आपल्याकडे चंद्रदर्शनानंतर सोमवारी (दि. 25) ईद साजरी होण्याची शक्यता आहे. मुस्लीम कॅलेंडरमध्ये चंद्र दर्शनाला महत्त्व आहे.
शेवयांचे दर वाढले दुपटीने
ईदनिमित्त बनविण्यात येणाऱ्या शीरखुरम्यासाठी चुंबल, लच्छा शेवई तसेच कच्चा बनारसी, रोस्ट बनारसी आदी प्रकारांतील शेवयांची खरेदी करण्यात आली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत शेवयांचे दर दुपटीने वाढले आहेत. दोनशे रुपयांपासून चारशे रुपये किलोपर्यंत शेवया उपलब्ध होत्या. त्याशिवाय, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, किसमिस, खारीक, खोबरा, खजूर आदींची देखील विक्री सुरू होती. फरद, पिवळी खजूर, किमिया डेट्स, मेडजोल खजूर आदींना चांगली मागणी होती. 120 रुपये ते 1 हजार रुपये प्रति किलो असे त्यांचे दर होते.