फलटण -लॉकडाऊन नियम आणखी शिथिल करुन गुरुवारी जिल्हा अंतर्गत एसटी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरीही प्रवाशीच नसल्यामुळे फलटण आगारातून अद्यापपर्यंत एकही बस धावलेली नाही.
करोनामुळे देशात सुमारे दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर उद्योग धंदे, व्यवसाय, सर्व प्रकारची वाहतूक बंद आहे. मात्र राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल करुन काही प्रकारच्या उद्योग व्यवसायांना, दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय गुरुवारी लॉकडाऊन आणखी शिथिल करुन जिल्हा अंतर्गत एसटी वाहतुकी परवानगी देण्यात आली आहे. मात्र करोनामुळे लोक एकमेकांच्या घरीदेखील जात नसल्याने प्रवास करण्याची शाश्वती कमीच आहे.
त्यामुळे एसटी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर फलटण आगारातील एकही एसटी अद्याप रस्त्यावर धावलेली नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस. टी.) सोशल डिस्टन्स सांभाळून क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेऊन बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद न लाभल्याने आज राज्यभर बसेस धावल्या नसल्याचे समजते. उद्यापासून काही प्रमुख मार्गावर बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फलटण आगारातून उद्या दुपारी 1 वाजता फलटण-सातारा मार्गावर एक बस सोडण्यात येणार असून ती दुपारी सातारा-फलटण मार्गावर परत येऊन सायंकाळी फलटण-सातारा अशी जाऊन सातारा येथे मुक्काम करेल, रविवारी सकाळी 6 वाजता सातारा-फलटण आणि सकाळी 8 वाजता फलटण-सातारा अशी धावणार आहे, उद्या प्रवाशी असोत अथवा नाही सदर बस फलटण-सातारा मार्गावर धावणार आहे. प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एस. टी. प्रशासनाने केले आहे. त्यानंतर प्रवाशांच्या मागणीनुसार जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.