मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शिनोली येथे 50 वर्षीय करोनाबाधित रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. करोनाबाधित रुग्ण शनिवारी (दि. 16) मुंबई-घाटकोपर येथून पत्नी आणि दोन मुलांसह शिनोली गावी आला आहे.
यावेळी त्यांना शिनोली येथील घरांमध्ये होम क्वारंटाइन करण्यात आले होते; परंतु संबंधित रुग्णाला रविवारी (दि. 17) त्रास होऊ लागल्याने त्यांना पुण्यातील नायडू हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. गुरुवारी (दि. 21) रात्री उशिरा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
शिनोली गावामध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने गाव पूर्णपणे बंद करण्यात आले आहे, तसेच करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची यादी काढण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. करोनाबाधित रुग्ण शिनोली गावठाणात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुलांसह राहत होता. तो अनेकांना भेटला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
शिनोली येथे तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी भेट दिली असून, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये यापूर्वी साकोरे येथे करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. आता शिनोली येथे दुसरा रुग्ण आढळून आला आहे. दोन्ही रुग्ण मुंबई येथून आलेले असल्याने मुंबईकरांमुळे ग्रामीण भागात करोनाचा शिरकाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.