रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यात आणखी दोघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात एका 42 वर्षीय महिला व 20 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. तीन जणांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवले होते, यापैकी दोन बाधित निघाले. हे दोघेही मुंबईवरुन इंदापूर तालुक्यातील पोंदकुलवाडी या मूळ गावी आलेले आहेत.
सध्या हे रुग्ण कोणाच्या संपर्कात आलेत का? किंवा यांच्या प्रवासाबाबत सखोल माहिती इंदापूर प्रशासनाकडून प्राप्त करण्याचे काम चालू आहे. शिवाय पोंदकुलवाडीचा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला असून त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू झाला आहे. मागील कालावधीत भिगवण परिसरातील एका महिलेला करोनाची लागण झाली होती आणि काही तासांतच तिचा मृत्यूही झाला. त्यानंतर दि. 16 मे रोजी मुंबई येथून इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथे परतलेल्या दोन मायलेकींना करोनाची बाधा झाली. त्यांच्यावर इंदापूरजवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे असताचा आता पोंदकुलवाडी येथे आणखी दोन रुग्ण आढळून आले.
सध्या इंदापूर तालुक्यात मुंबई, पुणे अशा हॉटस्पॉटमधून जवळपास अठरा हजारांहून अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत. शिरसोडी येथील दोन रुग्णांच्यानंतर केवळ सातच दिवसात आणखी दोन रुग्णांची भर पडल्याने इंदापूरकरांची चिंता अधिकच वाढली आहे. हे दोन्हीही रुग्ण पोंदकुलवाडीत त्यांच्या घरीच क्वारंटाइन होते; त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता त्यांच्यावर इंदापुरातील डॉ. कदम गुरुकूल येथे उपचार केले जाणार असल्याची माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
पाच किलोमीटरचा परिसर बफर क्षेत्र….
करोना विषाणूंच्या प्रसाराचे माध्यम पाहता कोणतेही इतर व्यक्तींना होऊ नये म्हणून तात्काळ नियंत्रण करण्यासाठी पोंदकुलवाडी हा भाग केंद्रस्थानी धरून, गावाची संपूर्ण हद्द प्रतिबंधित क्षेत्र तर पाच किमीचा परिसर यामध्ये बिजवडी, राऊतवाडी, गागरगाव, राजवडी, वनगळी, तरंगवाडी, गोखळी, भोंगवस्ती, कौठळी या महसुली गावांची संपूर्ण हद्द हे बफर क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, अशी माहिती बारामती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.