नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) कार्यकारी मंडळ अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. करोना संकटाने जगभरात हाहाकार उडवला असतानाच्या काळात वर्धन यांच्या रूपाने भारताकडे आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा पदभार आला आहे.
करोनावर मात करण्यासाठी भारताने दिलेल्या लढ्याचे जगभरातून कौतुक होत आहे. त्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारताने अनेक देशांना विविध प्रकारची मदतही केली आहे. अशात 34 सदस्यीय मंडळाच्या अध्यक्षपदी वर्धन यांची निवड भारतासाठी मानाचे पान ठरले आहे. त्यांची निवड करण्याच्या प्रस्तावावर 194 देशांच्या जागतिक आरोग्य सभेने मंगळवारीच स्वाक्षरी केली.
त्यानंतर जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांच्या जागी वर्धन यांची निवड झाली. आता वर्धन यांच्याकडे ते पद वर्षभरासाठी असेल. डब्लूएचओ कार्यकारी मंडळाच्या वर्षातून साधारणपणे दोन बैठका होतात. त्या बैठकांचे नेतृत्व वर्धन करतील. जागतिक आरोग्य सभेने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कार्यकारी मंडळावर असते. त्याशिवाय, ते मंडळ आरोग्य सभेला सल्ला देते.