देहू (प्रतिनिधी) – देहूगाव येथील मुख्य मंदिराच्या मागील बाजूस इंद्रायणी नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मयत व्यक्तीचे हातपाय बांधून पोत्यात दगडासह टाकण्यात आले होते. ही घटना सोमवारी (दि. 18) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन दिवसांत खुनाची ही तिसरी घटना आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदी पात्रात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. देहूगाव येथील मुख्य मंदिराच्या मागील बाजूस इंद्रायणी नदीपात्रात एका पोत्यामध्ये हा मृतदेह आढळून आला. मयत व्यक्तीचे हात-पाय बांधण्यात आले होते. तसेच पोत्यामध्ये एक मोठा दगडही दिसून आला. मयत व्यक्तीचे वय अंदाजे पस्तीस वर्ष असून, त्याने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळी जिन्स पॅन्ट असा वेश परिधान केला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे, गुन्हे शाखा युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे आदी घटनास्थळी हजर झाले.
मयत व्यक्तीच्या जवळ एक मोबाइल, चार्जर, तेलाची पुडी आढळून आली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मयत व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी देहूरोड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देहूरोड पोलिसांनी केले आहे.
गेल्या दोन दिवसांत शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात उफाळून आली आहे. कोयत्याने वार, लूटमार, खुनी हल्ला, चोऱ्या आदी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत पिंपळे गुरव, पुनावळे आणि देहूगाव या परिसरात खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.