उद्यापासून बाजार बेमुदत बंद राहण्याचा परिणाम; सोशल डिस्टनिंगचा फज्जा
पुणे (प्रतिनिधी) – करोनाचे रुग्ण आढळल्याने मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभाग मंगळवार (दि.19) पासुन बेमुदत कालावधीसाठी बंद राहणार आहे. केवळ आज (सोमवार, दि.18) बाजार सुरु राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासून ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. परिणामी, सोशल डिस्टनिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
भुसार विभाग सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सूरू असतो. करोनामुळे व्यापारी, कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने बाजार बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातून किराणा दुकानदार आज मोठ्या संख्येन खरेदीसाठी आले होते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. बाजार समितीचे कर्मचारी गर्दी कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत होते. ड्रायफूट आणि किरकोळ विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही बाजारात गर्दी झाली होती.
सोमवारी माल घेऊन बाजारात सुमारे 180 गाड्यांची आवक झाली. टप्याटप्याने या गाड्या सोडण्यात येणार आहेत. झालेल्या गर्दीविषयी दि पूना मर्चंटस चेंबरचे सचिव विजय मुथा म्हणाले, बाजार किती दिवस बंद राहिल, हे सांगता येत नाही. भविष्यात मालाचा तुटवडा निर्माण होऊ नये. तसेच, मुस्लिमांचा रमजान ईद सण काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी झाली होती.
दुकानदारांनी दुचाकीवरही नेला माल
बाजारातुन माल नेण्यासाठी अनेकांना टमटम अथवा टेम्पो भाड्याने मिळालेच नाहीत. मात्र, बाजार सुरु असल्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अनेकांनी दोन, तीन, चार पोती म्हणजे जेवढा शक्य आहे. तेवढा माल दुचाकीवरून नेला. कित्येकांनी दुचाकीवर अनेक हेलपाटे मारले.