कराची – भारताप्रमाणे पाकिस्तानचाही राष्ट्रीय खेळ हॉकीच असला तरी एकीकडे भारतीय संघ दिवसेंदिवस गतवैभव मिळविण्याकडे वाटचाल करत आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानच्या हॉकीचा दर्जा मात्र खालावत चालल्याचे चित्र आहे.
करोनाच्या संकटामुळे सर्व स्पर्धा बंद असल्याने त्यांच्या संघटनेकडे खेळाडूंना देण्यासाठी पैसाच शिल्लक राहिलेला नाही. त्यातच प्रायोजकांनीही पाठ फिरविल्याने देशातील हॉकीची काय अवस्था होईल याचीही चिंता त्यांना लागलेली आहे. पाकिस्तानच्या हॉकी संघानेही जागतिक स्तरावर वर्चस्व राखले होते. ऑलिम्पिक स्पर्धेतही त्यांच्या संघाने आपला दबदबा निर्माण केला होता. गेल्या काही वर्षांपासून या खेळातील त्यांचे वर्चस्व कमी झालेले दिसत असून त्याचा दर्जा पूर्ववत करण्यात देखील त्यांना अपयश येत आहे.
करोनाचा धोका संपल्यावर देखील या परिस्थितीत काही बदल होण्याची खात्री त्यांना नाही. विविध स्पर्धा आयोजित करणे, तसेच परदेशातील व मानाच्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना पाठविणे यासाठी मंडळाकडे पैसाच नसल्याने आता आर्थिक स्थैर्यता कशी मिळवायची हाच त्यांच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.