लाहोर – माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला सणसणीत चपराक दिली आहे. मंडळाबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याने मंडळाने शोएबला नोटीस बजावली होती, त्यावर मी नव्हे तर माझे वकीलच उत्तर देतील. मी कोणावरही आरोप केलेले नाहीत तसेच कोणाचाही अपमान केलेला नाही, असे सांगत शोएबने मंडळालाच पुन्हा एकदा लक्ष्य केले.
गेल्या काही दिवसांपासून शोएबने मंडळावर तसेच मंडळाच्या कायदे विषयक सल्लागारांवर टीका केली होती. कायदे सल्लागार यांचे काम चांगले नाही. ते मंडळाची दिशाभूल करत आहेत. मात्र, मंडळाचे पदाधिकारी देखील त्यांच्या सल्ल्यांनुसार वागत आहेत, असे शोएबने म्हटले होते. त्यावर मंडळाने शोएबवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते.
याबाबत बाजू मांडण्यासाठी त्याला नोटीसही बजावली होती. त्यावेळी शोएब एक पाऊल मागे घेईल अशी अपेक्षा मंडळाला होती. मात्र, त्याने आक्रमक होत मंडळाची खिल्लीच उडवली आहे.