संयुक्त राष्ट्रे: एप्रिलमध्ये जगभरात दरदिवशी सरासरी 80 हजार करोनाबाधित आढळल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्लूएचओ) देण्यात आली. आता पश्चिम युरोपसारख्या विभागांमध्ये बाधितांच्या संख्येत घसरण दिसून येत आहे. मात्र, भारत आणि बांगलादेशसारख्या दक्षिण आशियाई देशांमध्ये बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याविषयी डब्लूएचओने चिंता व्यक्त केली आहे.
चीनमध्ये सर्वप्रथम मागील वर्षीच्या अखेरीस करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर त्या विषाणूने जगभरात कहर केला. आता 212 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. करोनाची बाधा झालेल्या जगभरातील रूग्णांची संख्या 38 लाखांवर पोहचली आहे. त्यातील 2 लाख 65 हजारांवरून अधिक रूग्ण आतापर्यंत दगावले आहेत. करोना संकटाची सर्वांधिक झळ अमेरिकेला आणि युरोप खंडातील काही देशांना बसली. आता डब्लूएचओने दिलेली माहिती पाहता एप्रिल महिन्यात करोना संकट अधिकच गडद झाल्याचे सूचित होत आहे. अनेक देशांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे.
करोनाबाधितांच्या संख्येत वाढ दिसण्याचे तेही कारण असल्याचे डब्लूएचओने नमूद केले आहे.
करोना संकटाने ग्रासलेल्या युरोपमधील काही देशांत महिलांवरील घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचेही डब्लूएचओने निदर्शनास आणून दिले आहे. प्रामुख्याने बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, रशियात घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तशाप्रकारच्या घटनांच्या फोनवरून येणाऱ्या तक्रारींमध्ये पाचपट वाढ झाल्याचे आढळले आहे.