मंचर -परप्रांतीय नागरिकांना घरी जाण्यासाठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी मंचर येथील उपजिल्हा रूग्णालयासमोर बुधवारी (दि. 6) लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रमाणपत्र देण्यासाठी मंचर उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकुण 17 कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती मंचर उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षिका डॉ. चंदाराणी पाटील यांनी दिली. यावेळी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसुन आले.
परप्रांतीय नागरिकांना घरी जाण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार त्यांना येथून आपल्या गावी जाताना सोबत वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे गरजेचे असल्याची अट सरकारने घातली आहे. त्यानुसार मंचर परिसरातील परप्रांतीय नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मंचर उपजिल्हा रूग्णालया समोर रांग लावली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी तीन डॉक्टरांवर संगणक चालक, शिपाई इत्यादी 17 जणांची टिम कार्यरत आहे. रांगेत उभे असलेले परप्रांतीय मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसुन येते.
मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी सोशल डिस्टन्सिंगचा वापर सर्वांनी करावा, असे आवाहन केले आहे. मंचर उपजिल्हा रूग्णालयात गेल्या दोन दिवसांत अंदाजे 300 नागरिकांना वैद्यकीय प्रमाणापत्र दिले असुन उर्वरित सर्वांना लवकरात लवकर वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाईल, असे डॉ. चंदाराणी पाटील यांनी यावेळी सांगितले.