सहा महिन्यांपासूनचा भत्ता रखडला
वडगावशेरी – राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. करोनाचा फैलाव होऊ नये याकरिता बंदोबस्त करण्यात आला आहे. अशावेळी पोलिसांबरोबर 24 तास रस्त्यावर तैनात असलेल्या जिल्ह्यातील तीन हजार होमगार्ड (गृहरक्षक दल जवान) यांचा भत्ता सहा महिन्यांपासूनचा रखडला आहे. हा भत्ता तातडीने देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील सर्वच शहरांत पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. यामध्ये होमगार्डही पोलिसांना मदत करीत आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना भत्ता देण्यात आलेला नाही. यामुळे लॉकडाऊनच्या काळात होमगार्ड आर्थिक संकटात सापडले आहेत. ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक तसेच नोव्हेंबरपासून नियमित कर्तव्य कालावधी व आहार भत्ता रखडलेला आहे.
होमगार्डला नियुक्तीवर असल्यास प्रतिदिन 570 रुपये कर्तव्य भत्ता आणि 100 रुपये आहार भत्ता दिला जातो. वरील कालावधीतील भत्याची पुणे जिल्ह्यातील होमगार्डची पाच कोटी 10 लाख रुपयांची देयके तयार करून जिल्हा कोषागार कार्यालयात सादर केली असल्याचे जिल्हा समादेशक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. निवडणुकीनंतर होमगार्डच्या भत्त्यासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वांची देयके तयार करून कोषागारात सादर करण्यात आली असली तरी मुंबई येथील कार्यालयाकडून अनुदान वितरीत केल्याचे पत्र आल्याशिवाय देयके मंजूर होणार नाहीत.
जिल्हा कार्यालयाकडे मिळालेली होमगार्डच्या भत्त्यांची देयके जिल्हा कोषागार कार्यालयात सादर केली आहेत. ही रक्कम पाच कोटी दहा लाख रुपये इतकी असून सर्वांची यादी तयार आहे. कोषागारातून देयके मंजूर होताच संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत.
– सुनीता शेलार, अधीक्षक, जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय