इस्लामबाद : करोनाची साथ वाढत असताना आपापसातील मतभेद मिटवावेत आणि देशातील करोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजनांवर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन अमेरिकेने अफगाणिस्तानमधील नेत्यांना केले आहे. तालिबानबरोबर झालेल्या कराराच्या अंमलबजावणीला अजून मुहुर्त मिळालेला नाही.
त्यातच अध्यक्षपदावरून अशर्रफ घनी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यात तीव्र रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे करोनाच्या साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी अफगाणिस्तानातील प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अफगाणिस्तानच्या प्रमुख नेत्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून करोनाच्या साथीला नियंत्रणत आणण्यावर लक्ष केंद्रीत करावे असे अफगाण-तालिबान-अमेरिका करारासाठीचे समन्वयक झालमाय खलिलझाद यांनी ट्विटद्वारे केले आहे.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशर्रफ घनी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी सप्टेंबरच्या निवडणुकीत स्वतःला विजयी घोषित केले होते. त्यांनी गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पवित्र रमजान महिन्यात स्वतःहून पुढे येऊन देशाचे हित जपले पाहिजे, असे ते म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अमेरिका-तालिबान शांतता करारानुसार कैद्यांची आदलाबदल करण्याचे आवाहन त्यांनी सरकार आणि तालिबानला केले.
आजपर्यंत, घनी यांनी 550 कैद्यांची सुटका केली आहे. मात्र हे कैदी करारात उल्लेख असलेलेच आहेत की नाही, हे तालिबानने स्पष्ट केलेले नाही. तालिबान्यांनी 60 कैद्यांना मुक्त केले आहे. तालिबानने अजूनही या कराराच्या बाजूनेच आहे आणि अफगाण सरकारशी देशव्यापी संघर्षविरामाबाबत बोलणी करण्यास तयार असल्याचे तालिबानचा प्रवक्ता झाबीउल्लाह मुजाहेद याने रविवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
2 फेब्रुवारी रोजी झालेल्या करारानंतर 10 दिवसांच्या आत या वाटाघाटी सुरू झाल्या असत्या, पण काबूलमधील राजकीय वादाच्या कारणास्तव या वाटाघाटी अद्याप रखडलेल्या आहेत. हा करार झाल्यापासून तालिबान्यांनी 2,804 हल्ले केले आहेत,
दरम्यान, नवीन करोना विषाणूमुळे अफगाणिस्तानात 1,463 जणांना संसर्ग झल आणि 47 जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानची आरोग्य व्यवस्था अनेक दशकांच्या युद्धग्रस्ततेमुळे मोठ्या प्रमाणात ढासळली आहे आणि त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर जैविक हानी होण्याची शक्यता आहे.