युरोपातील काही देशांमध्ये निर्बंध शिथिल
तर आशिया खंडात अजूनही उपाय योजना सुरूच
बीजिंग : जगभरातील करोनाग्रस्त देशांमधील मृत्यूचे आकडे दिवसा-दिवसाला वाढत चालले आहेत. मात्र तरिही तिथे लागू असलेला लॉकडाऊन हटवण्याची तयारी तिथल्या सरकारांच्यावतीने सुरू झाली आहे. तर काही ठिकाणच्या प्रांतिय सरकारवर स्थानिक जनतेकडून लॉकडाऊन हटवण्यासाठी दबाव यायला लागला आहे.
लॉकडाऊन हटवून वाहतुक आणि सार्वजनिक कार्यक्रमांना पुन्हा परवानगी देण्यात यावी, यासाठी अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये निदर्शनेही व्हायला लागली आहेत. त्यामुळे करोनाला प्रतिबंध करण्यासाठी जगभर असलेल्या लॉकडाऊनचे भविष्यच धोक्यात आले आहे. त्याचा परिणाम करोनाच्या फैलावाचा दुसरा सामुहिक संक्रमणाचा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे. हवाईने आपली “स्टे ऍट-होम’ची ऑर्डर मे-अखेरीपर्यंत वाढविली आहे. तर अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथे उद्यानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढायला लागल्यामुळे पोलीसांनी उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जगभरात करोनाच्या संसर्गामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. उद्योग धंदे बंद असल्यामुळे निर्माण झाल्यामुळे संभाव्य मंदी टाळण्यासाठी अमेरिकेतील काही प्रांतात सवलती मिळवण्यासाठी चक्क आंदोलनांना सुरुवात झाली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, प्रवासी कामगार आणि अनेक ठिकाणी विशेषतः गरीब लोकांना याचा फटका बसला आहे. निर्बंधावरून बर्लिन ते टेक्सास पर्यंत “स्टे ऍट होम’चे आदेश मोडून काढण्यात आले.
दरम्यान, असोसिएटेड प्रेस-एनओआरसी सेंटर फॉर पब्लिक अफेयर्स रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की अमेरिकन नागरिकांनी “स्टे ऍट होम’ची उपाययोजना आणि इतर प्रयत्नांचे पालन केले आहे. जॉर्जिया आणि ओक्लाहोमा यांनी सलून, स्पा आणि केअर कटिंग दुकानांना पुन्हा उघडण्याची परवानगी दिली आहे. तर अलास्कामध्ये रेस्टॉरंट्स, किरकोळ दुकाने आणि इतर व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
भारतात आता दुकाने उघडण्यासाठी सवलती दिल्या जात आहेत. तर श्रीलंकेत नव्याने लॉकडाऊन जाहीर केले गेले आहे. चीनमधील वुहान शहरात करोनाची सुरुवात झाली होती. तेथे आता सर्व मोठे बांधकाम प्रकल्प पुन्हा सुरू झाले आहेत कारखान्याचे उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी तिथल्या अधिकाऱ्यांनी दबाव आणला आहे. युरोपात स्पेन, इटली आणि फ्रान्समध्येही मे महिन्याच्या सुरुवातीला लॉकडाऊन शिथिल करण्याची तयारी झाली आहे. मात्र ब्रिटनने अद्याप तशी कोणतीही हालचाल दर्शवलेली नाह्.