आता राज्यातील 96 पोलीस करोना पॉझिटिव्ह
मुंबई : राज्यासह मुंबईत करोनाचा कहर कायम असून करोनाच्या कचाट्यात पोलीस आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचारीही येत आहेत. मुंबईत एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी येथील रहिवासी होता.
संबंधित पोलिसाला करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत 96 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. 96 पोलिसांत 15 अधिकाऱ्यांचा आणि 81 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने दिली. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे 22 एप्रिलला एकाच दिवसात तब्बल 15 पोलिसांना करोनाची लागण झाली होती. आता राज्यातील 96 पोलीस करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.