बीजिंग : करोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये संसर्गाची लक्षणे दिसण्याच्या 3-4 दिवस आगोदरपासूनच त्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संसर्ग व्हायला सुरुवात होते, असे एका अभ्यासाद्वारे निदर्शनास आले आहे. लक्षणे दिसायला लागल्यानंतर उपाय योजना लगेच सुरू केल्यास उपाय योजनांचा परिणाम कमी होऊ शकतो, असेही या अभ्यासामध्ये म्हटले आहे. “जर्नल नेचर मेडिसीन’मधील लेखामध्ये यासंदर्भातील अभ्यासाचा लेख प्रसिद्ध झाला आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या नियंत्रण उपायांच्या कार्यक्षमतेवर अनेक घटक परिणाम करु शकतात, असे या लेखात म्हटले आहे. यामध्ये संसर्गाच्या प्रादुर्भावाची शृंखलेतील कालावधी आणि संसर्ग झाल्यापासून विषाणूचा प्रादुर्भाव होईपर्यंतच्या उष्मायन (इन्क्युबेशन)च्या कालावधीमुळेही हा परिणाम होऊ शकतो. असे हॉंगकॉंग युनिव्हर्सिटीच्या एरिक लाउ यांच्यासह काही संशोधकांनी म्हटले आहे.
चीनमधील गुआंगझौ आठव्या पीपल्स हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या करोनाच्या 94 रुग्णांमधील “व्हायरल शेडिंग’चे विश्लेषण संशोधकांनी केले. लक्षणे दिसायला लागल्यानंतर लगेचच घशातील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यानंतर 32 दिवसांपर्यंत हे नमुने घेतले गेले होते. एकूण 414 नमुन्यांचे विश्लेषण केले गेले. लक्षणे दिसण्याच्या सुरुवातीच्या काळातच विषाणूंचे प्रमाण सर्वाधिक होते, असे या विश्लेषणात आढळले आहे.
जर संसर्ग झाल्याचे वेळेवर ओळखता येऊ शकले नाही, तर लक्षणे दिसेपर्यंत त्या व्यक्तीकडून अधिक जणांना संसर्ग होऊ शकतो, असे या अभ्यासामध्ये म्हटले आहे.