नवीन नियमावलीची कडेकोट अंमलबजावणी होणार
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णालयात सर्व प्रकारची दक्षता घेऊन काम करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर सगळी खबरदारीची उपाययोजना करून स्व. अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजार चालवले जाईल. दरम्यान, शुक्रवार (दि. 24) पासून मांजरी उपबाजारात नवी नियमावली राबविण्यात येत असल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी गुरूवारी दिली.
बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे रोगाचा प्रार्दुभाव होऊ नये या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपायुक्त (झोन-5) सुहास बावचे यांच्या उपस्थितीत मांजरी उपबाजारातील बाजार घटकांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी शुक्रवार (दि. 24) पासून नव्या नियमानुसार बाजार सुरू करण्यावर बाजार घटकांनी एकमताने मंजुरी दिली. त्यानुसार हा बाजार सुरू करण्यात आला आहे.
नव्या आदेशानुसार…
– उपबाजार आवारातील फळभाजीपाला या शेतीमाल विक्रीची वेळ सकाळी 6 ते दुपारी 11 अशी राहील.
– फक्त शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकरी व अनुज्ञप्तीधारक बाजार घटकांना प्रवेश दिला जाईल. तर, फुलांचा बाजार बंद राहिल.
– सकाळी सहा वाजता कवडीपाट टोलनाका येथून प्रथम चाळीस शेतीमाल घेऊन येणारी वाहने बाजारात सोडण्यात येतील. त्यानंतर एक तासाच्या अंतराने 40 वाहने अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने फक्त 120 वाहनांना बाजार आवारामध्ये प्रवेश देण्यात येईल.
– शेतमाल आणणाऱ्या वाहनधारकांनी आपली वाहने कवडीपाट टोलनाका येथे रांगेत उभी करावी. तेथे प्रवेश पास दिला जाईल. त्याशिवाय कोणत्याही वाहनांना बाजार आवारामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तर, सकाळी 6.30 पासून 60 वाहनांच्या गटाने फक्त 180 खरेदीदारांच्या वाहनांना मांजरी फाटा 15 नंबर चौक येथून मांजरी उपबाजार आवारात मध्ये सोडण्यात येईल.
– खरेदीदार यांना बाजारामध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांनी एक तासाचे आत शेतीमाल खरेदी करून आपले वाहन बाहेर घेऊन जाणे बंधनकारक. जास्त वेळ लावल्यास त्यास पुन्हा प्रवेश नाही.
किरकोळ खरेदी-विक्री पूर्णपणे बंद
करोना विषाणू बाधित क्षेत्रातील बाजार घटकांना आवारात येण्यास बंदी आहे. शेतीमाल घेऊन येणाऱ्या व खरेदीसाठी येणाऱ्या अथवा कोणत्याही प्रकारच्या दुचाकी वाहनांना बाजारावर मध्ये प्रवेश दिला जाणार नाही बाजारामध्ये किरकोळ खरेदी विक्री पूर्णपणे बंद राहील. बाजारामध्ये सामाजिक अंतर पाळणे सर्व बाजार घटकांवर बंधनकारक असेल तसेच प्रत्येक बाजार घटकाने बाजार आवारात मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.