नवी दिल्ली – आज जागतिक वसुंधरा दिन. प्रतिवर्षी 22 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात पर्यावरण संरक्षणासाठी साजरा केला जातो. या वर्षी जागतिक पृथ्वी दिवस आपली पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. या खास दिवशी गुगलने आपले खास डूडल तयार केले आहे. यावेळी गुगलने आपले खास डूडल पृथ्वीवरील सर्वात लहान आणि महत्वाच्या मधमाशीला समर्पित केले आहे. यामध्ये गुगल ने आपल्या प्ले ऑप्शन बटनसोबत मधमाशी देखील दाखवली आहे. या प्ले बटनवर युजर्स जेव्हा क्लिक करतील त्यावेळी एक छोटा व्हिडीओ सुरू होईल आणि त्यामध्ये मधमाश्यांचे महत्व सांगण्यात आले आहे. कारण मधमाश्या परागीभवनाच्या कृतीमधून जगभरातील पिकांमध्ये आपलं दोन तृतीयांश आपले योगदान देतात.
याबरोबरीने गुगलने आपल्या युजर्ससाठी एक गेम देखील तयार केला आहे. यामध्ये युजर्स मधमाशी आणि अवकाशातील ग्रहांबाबत काही मजेशीर गोष्टी शिकतील. मधमाशा फुलांवर बसतात आणि जीवन पुढे वाढवण्याचं काम करतात. जगभरातील लोकांना मधमाशांच्या योगदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गुगलने हे खास डूडल बनवले आहे.