टाकळी ढोकेश्वर – करोनाच्या धर्तीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्यातच पेट्रोल पंप, बॅंका, विविध कार्यकारी सेवा संस्थांना वेळेचे बंधन असल्याने तेथे जनतेची मोठी झुंबड उडत आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने पोलीसही हतबल झाले आहेत.
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील पेट्रोल पंपावरसकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत पेट्रोल देण्यात येते. टाकळी ढोकेश्वर हे 35 ते 40 गावांची बाजारपेठ असल्याने पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांना तीस ते 40 किलोमीटर वरून यावे लागत असल्याने या पेट्रोल पंपावर सकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या दरम्यान अर्धा ते एक किलोमीटर रांगा लागत आहेत. तर दुसरीकडे शासनाने सुरू केलेल्या संजय गांधी व श्रावणबाळ या योजनांच्या माध्यमातून एक हजार रुपये मानधन काढण्यासाठी ग्रामीण भागातील वृद्ध, अपंग, विधवांसह विविध लाभधारक जिल्हा बॅंकेच्या शाखांपुढे गर्दी करत आहेत.
तिसरीकडे शासनाने लॉंकडाऊनमुळे गोरगरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानांमार्फत माणशी पाच किलो धान्य वाटप सुरू केले असून, यासाठीही लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पोलीसही हतबल झाले आहेत.
पोलीस प्रशासनाची दमछाक..!
पारनेर तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. तालुक्याचा विचार करता व गुन्ह्यांचे प्रमाण पाहता पोलिसांवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे जनतेने गरज नसताना बाहेर न पडता घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले आहे.